
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ योजना अधिक प्रभावी करण्यावर भर
जळगाव पोलीस दलाची विशेष कार्यशाळा; विद्यार्थ्यांशी संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्यात पोलीसांविषयी विश्वासाचे नाते अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने जळगाव पोलीस दलामार्फत ‘पोलीस काका – पोलीस दीदी’ योजनेअंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील संबंधित अंमलदारांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून चैतन्य वेलनेस बीइंग अँड काउंसलिंगच्या संस्थापक डॉ. सोनल खलाने तसेच डॉ. रेणुका चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांशी संवेदनशील पद्धतीने संवाद कसा साधावा, त्यांचे समुपदेशन कसे करावे, एखादी घटना घडल्यानंतर कोणती SOP (Standard Operating Procedure) पाळावी तसेच कायद्याच्या चौकटीत राहून प्रभावीपणे काम कसे करावे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
रोल प्ले आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण
कार्यशाळेदरम्यान विविध प्रात्यक्षिके आणि रोल प्ले सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांशी विश्वासार्ह संवाद निर्माण करण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी, संवेदनशील घटनांमध्ये पोलीसांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना योग्य मदत कशी करावी यावर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणात सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांना शालेय वातावरणातील समस्या प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या. त्यामुळे भविष्यात शाळांमध्ये काम करताना अधिक प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने काम करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
नेमकी काय आहे ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ योजना?
‘पोलीस काका / पोलीस दीदी’ ही महाराष्ट्र पोलिसांच्या कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना ईव्ह-टीझिंग, रॅगिंग, ड्रग्स, सायबर गुन्हे, हिंसाचार आणि इतर धोक्यांपासून संरक्षण मिळावे तसेच वेळेवर मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.
या योजनेअंतर्गत पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संवाद वाढून विश्वासाचे नाते अधिक मजबूत होते.
प्रत्येक शाळेसाठी पोलीस प्रतिनिधी
या योजनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांसाठी PC ते ASI दर्जाच्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मुलींच्या शाळांसाठी विशेषतः ‘पोलीस दीदी’ नेमण्यात येते. साधारणपणे एका पोलीस काका किंवा दीदीकडे दोन ते तीन शाळांची जबाबदारी असते.
योजनेवर संबंधित पोलीस निरीक्षक (PI) यांचे नियंत्रण राहणार असून एका PSI ला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते. हे नोडल अधिकारी सर्व पोलीस काका–दीदी यांच्या कामकाजावर लक्ष ठेवतील. समन्वयासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपसारख्या माध्यमांचाही वापर केला जाणार आहे.
तक्रारींवर तातडीने कारवाई
शाळा परिसरात ईव्ह-टीझिंग, हिंसाचार, विद्यार्थ्यांना त्रास किंवा अन्य प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास पोलीस काका–दीदी तातडीने मदत करतील. आवश्यकतेनुसार बीट मार्शल, बीट स्टाफ किंवा दामिनी पथकाची मदत घेऊन त्वरित कारवाई केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.
“विद्यार्थ्यांच्या मनात पोलीसांविषयी भीती नव्हे तर विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ योजना ही केवळ सुरक्षा उपक्रम नसून विद्यार्थ्यांसाठी आधार आणि मार्गदर्शन देणारी संवेदनशील संकल्पना आहे.”
— डॉ. सोनल खलाने, प्रमुख मार्गदर्शक, चैतन्य वेलनेस बीइंग अँड काउंसलिंग




