
जळगाव विधान परिषदेसाठी भाजपाकडून डॉ. केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर
शिवसेना शिंदे गटाचाही जागेवर दावा; महायुतीत तिढा कायम
जळगाव l प्रतिनिधी l जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाकडून माजी खासदार उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असली तरी या जागेवर शिवसेना शिंदे गटानेही दावा कायम ठेवल्याने जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनीही विधान परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जळगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला यावी, यासाठी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जळगाव मतदारसंघात महायुतीतच रस्सीखेच वाढताना दिसत आहे.
नाशिक-जळगाव समीकरणावर लक्ष
राजकीय वर्तुळात सध्या नाशिक आणि जळगाव या दोन जागांबाबत चर्चांना उधाण आले आहे. नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्या जागेवर भाजपानेही दावा केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजपाला मिळाल्यास जळगावची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली जाऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
डॉ. केतकी पाटील यांचे नाव चर्चेत
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. केतकी पाटील यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. पक्ष संघटनात्मक स्तरावरही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याने उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
सोमवारी होणार निर्णय?
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत अंतिम निर्णय कळविण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जळगाव विधान परिषद जागेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




