
खिचडी न दिल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून; आरोपी अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाण्यासाठी मागितलेली खिचडी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ४० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीवन शालिक पाथरकर (वय ४०, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. रामानंदनगर परिसर, जळगाव) हे ८ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रामानंदनगर भागातील एका मोकळ्या जागेत बसले होते. त्यावेळी अंकुश नथ्थू पाटील (वय ४६, रा. समतानगर, जळगाव) याने त्यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली. मात्र जीवन पाथरकर यांनी खिचडी देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला.
रागाच्या भरात आरोपीने जवळ पडलेला सिमेंट काँक्रीटचा मोठा दगड उचलून जीवन पाथरकर यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मयताचे भाचे तुषार राजेंद्र सुतार (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.





