खान्देशगुन्हेजळगांव

महामार्गावरील लुटमारीचा पर्दाफाश; ‘बटाटा’ गँगसह चार अट्टल गुन्हेगार अवघ्या दोन तासांत गजाआड

महामार्गावरील लुटमारीचा पर्दाफाश; ‘बटाटा’ गँगसह चार अट्टल गुन्हेगार अवघ्या दोन तासांत गजाआड

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव तालुका पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि कौशल्यपूर्ण तपास करत चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना अवघ्या दोन तासांत जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटे नगर, जळगाव) हे त्यांच्या साथीदारांसह मोटारसायकलने जळगाव–पाळधी मार्गे प्रवास करत होते. दरम्यान हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार संशयितांनी त्यांची मोटारसायकल अडवली.

आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली, शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच त्यांच्या खिशातील सुमारे ७,८०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी मोटारसायकलची तोडफोड करून घटनास्थळावरून पलायन केले.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले.

गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी

चेतन ऊर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव)

उमाकांत दत्तात्रेय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव)

गौरव संजय जाधव (वय २१, रा. साई नगर, जळगाव)

रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी काहीजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने पार पाडली. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button