खान्देशजळगांवशासकीय

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान

६३० मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रतिष्ठेच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष

जळगाव : जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान होत असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ३१५ महिला व ३१५ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये काही दिवस राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपच्या वाट्याला जागा गेल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर रेश्मा काळे यांनी माघार घेतल्याने महायुतीतील अंतर्गत वाद निवळले.

महायुतीकडून विविध बैठका आणि संपर्क मोहिमांच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना एकसंघ मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीची सर्व मते अधिकृत उमेदवाराच्या पारड्यात पडतात का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनाही आघाडीतील सर्व घटक पक्षांचा कितपत एकमुखी पाठिंबा मिळतो, याबाबत उत्सुकता आहे. तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी जिल्हाभर प्रचाराची जोरदार मोहीम राबविल्याने त्यांना मिळणाऱ्या मतांचीही चर्चा रंगली आहे.

मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशी विविध पक्षांच्या ताकदीचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button