सामाजिक

१५ वर्षांपासून नागरिकांची तहान भागवणारे हेमंत महाजन; ट्युबवेल पुन्हा सुरू होताच परिसराला दिलासा

१५ वर्षांपासून नागरिकांची तहान भागवणारे हेमंत महाजन; ट्युबवेल पुन्हा सुरू होताच परिसराला दिलासा

सावदा प्रतिनिधी | मुख्तार शेख

सावदा येथील शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगरसेवक हेमंत महाजन हे गेल्या १५ वर्षांपासून आपल्या शेतातील ट्युबवेलद्वारे परिसरातील नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे मदिना नगर, ताजुशरिया नगरसह परिसरातील शेकडो कुटुंबांची तहान भागत असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

मोटार बंद पडल्याने पाणीटंचाई

गेल्या तीन ते चार दिवसांपासून ट्युबवेलची मोटार तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राजेश वानखेडे, फरिद शेख, युसूफ शाह व जुबेर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन मोटार बसविण्याची व काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

टँकरद्वारे तात्पुरती व्यवस्था

पाणीटंचाईच्या काळात बाबू मेंबर रविवापेठ यांनी स्वतःच्या टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करून मोठा दिलासा दिला. त्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय टळली.

पालिकेची तातडीची कारवाई

अखेर १९ जून रोजी मोटार दुरुस्त झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने त्वरित कर्मचारी पाठवून ती बसविण्याची कार्यवाही केली. परिणामी ट्युबवेल पुन्हा सुरू झाला असून परिसरातील नागरिकांची पाणीटंचाई दूर झाली आहे. सध्या नागरिकांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.

सामाजिक कार्याचे होत आहे कौतुक

गेल्या १५ वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून देणारे नगरसेवक हेमंत महाजन यांच्या कार्याबद्दल परिसरात आदर आणि सन्मानाची भावना व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नगरसेवक राजेश वानखेडे, फरिद शेख, युसूफ शाह, जुबेर तसेच बाबू मेंबर यांच्या प्रयत्नांचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजनांची अपेक्षा

दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button