सावद्यात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा पालिकेत संताप व्यक्त

सावद्यात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा पालिकेत संताप व्यक्त
ख्वाजा नगर परिसरातील रहिवाशांचे निवेदन; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
सावदा (प्रतिनिधी – मुख्तार शेख) : सावदा शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून ख्वाजा नगर परिसरातील रहिवाशांनी मंगळवारी (दि. २३ जून) नगरपालिकेत निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
पाणीपुरवठा सभापतींना जाब
निवेदन देताना नागरिकांनी पाणीपुरवठा सभापती फिरोज खान यांना जाब विचारत, “सामान्य नागरिकांनी आणखी किती दिवस पाणीटंचाईचा सामना करायचा?” असा सवाल उपस्थित केला. वारंवार तक्रारी करूनही समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असल्याचे यावेळी दिसून आले.
खासगी ट्युबवेलमुळे मिळतोय दिलासा
मदिना नगर व ताजुशरिया नगर परिसरातील नागरिकांनी सांगितले की, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून हेमा महाजन यांच्या शेतातील ट्युबवेलच्या पाण्यामुळे या भागातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. हे पाणी उपलब्ध नसते तर या परिसरालाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला असता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर
पाणीटंचाईबरोबरच शहरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला असल्याचे नागरिकांनी नमूद केले. गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार केल्यास कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण दिले जाते. हद्दवाढीनंतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
ठोस निर्णयाची अपेक्षा
पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
नागरिकांची उपस्थिती
यावेळी हाजी कादिर साहेब, माजी उपनगराध्यक्षा सौ. नंदा ताई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




