खान्देशगुन्हेजळगांव

जुन्या वादातून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला

जुन्या वादातून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला

एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल; जखमी तरुणावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू

जळगाव, प्रतिनिधी  शिरसोली (प्र. न.) गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जुन्या भांडणाची कुरापत काढून दापोरा येथील एका तरुणाला अडवून त्याच्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २६ जून रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली स्मशानभूमीजवळ हा थरार घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी तरुणावर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू आहेत.

फिर्यादी विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) हा तरुण सुप्रीम कंपनीत मजुरीचे काम करतो. २६ जून रोजी रात्री तो आपले मित्र रोशन मधुकर लांबोडे आणि ललित ज्ञानेश्वर भोई यांच्यासोबत रोशनच्या पल्सर दुचाकीने (क्र. MH 19 EM 9295) शिरसोलीवरून दापोऱ्याकडे जात होता. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते शिरसोली स्मशानभूमीजवळून जात असताना, संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी (सर्व रा. शिरसोली) यांनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवली.

संशयितांनी विशाल आणि त्याच्या मित्रांना थांबवून, “२५ जून रोजी रात्री गावात दर्शन देवरे, रवी मिस्तरी, मयुर भोई आणि प्रेम सोडव यांच्यात झालेल्या भांडणात तुम्ही देखील होतात,” अशी कुरापत काढली. यावरून वाद घालत त्यांनी शिवीगाळ करत तिघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण सुरू असतानाच संशयित दीपक भिल याने स्वतःजवळील चॉपर (तीक्ष्ण हत्यार) काढून विशाल पाटील याच्या डाव्या हाताच्या दंडावर आणि कोपरावर वार केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी होऊन रक्ताळला. तसेच जाताना या तिघांनी “पुन्हा नादी लागलात तर जीवे मारू,” अशी धमकी दिली.

मित्रांच्या मदतीने रुग्णालयात धाव

हल्ल्यानंतर घाबरलेल्या विशाल आणि त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला व गावातील ओळखीचा तरुण शुभम सोनवणे याला फोन करून तातडीने बोलावून घेतले. शुभमने जखमी विशालला थेट जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी विशाल पाटील याने रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button