
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३० मोटारसायकलींसह चौघे ताब्यात
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; २५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र-गुजरातमधील अनेक गुन्हे उघड
मुक्ताईनगर, प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य पातळीवर दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन मुख्य संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयितांनी केवळ संबंधित गुन्ह्यातील मोटारसायकलच नव्हे, तर आणखी २९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीनंतर या दुचाकी विविध रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील ‘पे अँड पार्क’मध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात उघड झाले.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या चोरीच्या दुचाकींबाबत गुजरातमधील उधना (सुरत) तसेच महाराष्ट्रातील कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असिम तडवी, कल्पेश आमोदकर तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.





