खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव जिल्ह्यात 14 ते 28 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात 14 ते 28 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विनापरवानगी सभा, मिरवणुका व पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये, यासाठी 14 जुलै 2026 रोजी रात्री 00.01 वाजेपासून 28 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

आगामी पंधरवड्यात विविध सण-उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी तसेच 25 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रम आणि ग्रामीण भागातून पालख्या निघणार असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय राहणार बंदी?

आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या, काठ्या किंवा इजा पोहोचवू शकतील अशा वस्तू घेऊन फिरण्यास बंदी राहणार आहे. तसेच स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणे, दगड किंवा इतर फेकण्यायोग्य साधने जमा करणे अथवा सोबत ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल असे घोषणाबाजी, आक्षेपार्ह भाषणे, हावभाव, फलक किंवा चित्रांचे प्रदर्शन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

विनापरवानगी सभा-मिरवणुकांवर निर्बंध

मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 37 (3) नुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास तसेच पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

यांना आदेशातून सूट

लाठीच्या आधाराशिवाय चालू न शकणारे वृद्ध व दिव्यांग नागरिक, शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा, विवाह मिरवणुका, धार्मिक मिरवणुका तसेच कर्तव्याच्या अनुषंगाने शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

हे प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button