खान्देशगुन्हेजळगांव

ट्रकचालकाच्या खूनप्रकरणातील संशयित रावेरमधून जेरबंद

ट्रकचालकाच्या खूनप्रकरणातील संशयित रावेरमधून जेरबंद

गळा आवळून हत्या केल्यानंतर ट्रकला आग लावल्याचा संशय; रावेर पोलिसांची काही तासांत धडाकेबाज कारवाई

रावेर | प्रतिनिधी

अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकचालकाचा गळा आवळून खून करून त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावल्याच्या गंभीर प्रकरणातील संशयिताला जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळविले आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही वेगवान कारवाई करण्यात आली.

जळालेल्या ट्रकमध्ये मृतदेहाचा शोध

मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान हा अपघात नसून चालकाचा प्रथम गळा आवळून खून करण्यात आल्याचा आणि त्यानंतर मृत्यूचे खरे कारण लपविण्यासाठी तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रकला आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

अस्पष्ट फोटोवरून शोधमोहीम

अमरावती ग्रामीण पोलिसांकडून संशयित रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. संशयिताचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध असतानाही पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तो पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.

ट्रक जप्त; पुढील तपास अमरावती पोलिसांकडे

ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८, रा. मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर, पंजाब) अशी झाली आहे. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाचा आयशर ट्रक (क्रमांक PB-02-EW-4299) जप्त करण्यात आला असून तो सध्या रावेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे. संशयिताचा ताबा घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रावेर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

अल्प माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढून त्याला काही तासांत ताब्यात घेण्यात रावेर पोलिसांना यश आले. या समन्वयपूर्ण आणि तत्पर कारवाईबद्दल जिल्हा पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button