
एटीएम चोरीप्रकरणी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
जळगावात पुन्हा चोरीच्या तयारीत असताना दोघांना अटक
जळगाव : प्रतिनिधी | दि. १५ एप्रिल २०२६
जळगाव शहरातील एटीएम चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगारांच्या टोळीतील दोन जणांना अटक केली आहे. चोरीच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एटीएम मशीन चोरीची धाडसी घटना
३ एप्रिल रोजी पोलन पेठेतील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्स येथील इक्वीटस स्मॉल बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. बँक व्यवस्थापक हरीष विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या धाडसी प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
गोपनीय माहितीवर सापळा यशस्वी
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी पुन्हा जळगावात चोरीसाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानुसार १४ एप्रिल रोजी मन्यारखेडा रोडवर सापळा रचून मोबीन आत्मज मिला (वय २८) व अब्दुल करीम नूर हसन (वय ५२, दोघेही उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
अटक आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले असून, फरहान व अकबर मुजाहोद हे साथीदार अद्याप फरार आहेत. या टोळीने महाराष्ट्रासह झारखंड व इतर राज्यांत एटीएम चोरीचे गुन्हे केल्याचेही समोर आले आहे. आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
वाहनांचा वापर करून नियोजनबद्ध चोरी
एटीएम चोरी करण्यासाठी आरोपींनी शनीपेठ पोलीस ठाणे हद्दीतून महिंद्रा पिकअप वाहन चोरून त्याचा वापर केल्याचे उघड झाले आहे. तसेच घटनास्थळी वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, लक्ष्मण पाटील, सलीम तडवी, विनोद पाटील, प्रविण भालेराव, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख तसेच पोलीस अंमलदार रविंद्र कापडणे, राहुल रगडे, सिद्धेश्वर डापकर, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, छगन तायडे, हेमंत पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे, चालक दिपक चौधरी, बाबासाहेब पाटील, प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे, रिझवान शेख,
प्रदीप चौरे आणि तांत्रिक सहाय्यक गौरव पाटील ,मिलिंद जाधव, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, पंकज पाटील, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




