खान्देशगुन्हेजळगांव

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी; ११ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन चोरटे जेरबंद

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी; ११ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन चोरटे जेरबंद

साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत; जळगावसह मध्यप्रदेशातील चोरीच्या गुन्ह्यांची उकल, विशेष पथकाची दमदार कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. विशेष तपास मोहीम राबवत पोलिसांनी तीन स्वतंत्र कारवायांमध्ये ११ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तसेच शेजारील भागातील अनेक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

विशेष पथकाची प्रभावी मोहीम

शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी विशेष पथकाची स्थापना करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

पहिल्या कारवाईत सात मोटारसायकली जप्त

सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जियाउलहक अब्दुलहक शेख (रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जळगावसह इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या मोटारसायकली जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्यप्रदेशातील विविध ठिकाणांहून चोरी झाल्याचे तपासात समोर आले.

दुसऱ्या कारवाईत तीन मोटारसायकली हस्तगत

दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी उमेश प्रदीप पाटील (रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर, सध्या रायपूर एमआयडीसी, जळगाव) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. एमआयडीसी आणि फुले मार्केट परिसरातील वाहनचोरीच्या घटनांशी त्याचा संबंध असल्याचा तपास सुरू आहे.

पेट्रोलिंगदरम्यान तिसरा आरोपी ताब्यात

१७ जुलै रोजी पेट्रोलिंगदरम्यान कैलास वसंतदास मथुरे (रा. जुनोने, ता. जामनेर) हा संशयास्पदरीत्या चोरीच्या हिरो HF डिलक्स मोटारसायकलसह फिरताना आढळून आला. चौकशीत संबंधित वाहन सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

वाहन पार्क करताना सुरक्षित ठिकाणाची निवड करावी, वाहनाला लॉक लावावे तसेच अतिरिक्त सुरक्षा साधनांचा वापर करावा. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना केले आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या मोहिमेत संजय दोरकर, महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, संजय लाटे आणि अजय आहिरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button