
धुळे जि. प. सुरक्षा रक्षक नोंदणीसाठी ७.५ लाखांची लाच; पारोळ्यात ४ लाख ८० हजार घेताना सुपरवायझर जाळ्यात
जळगाव एसीबीची धडक कारवाई
जळगाव : जिल्हा परिषद धुळे येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात अधिकृत नोंदणी करून देण्यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. पारोळा शहरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून, तडजोडीअंती ठरलेली ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर बारकु कालू पाटील याला पंचांसमक्ष रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेतील फिटर पुरुषोत्तम मंगाजी वाघ यालाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे लाचेचे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गेल्या १४ महिन्यांपासून जिल्हा परिषद, धुळे येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारासह अन्य चार सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात कायमस्वरूपी नोंदणी करून देण्यासाठी प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
तक्रारदाराने यापूर्वीच १ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही काम न झाल्याने त्यांनी कामाबाबत विचारणा केली. ८ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने जि. प. फिटर पुरुषोत्तम वाघ यांची भेट घेतली असता, वाघ यांनी उर्वरित ६ लाख ५० हजार रुपये तातडीने देण्याची मागणी केली. या प्रकारानंतर तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे जाऊन थेट फिर्याद नोंदवली.
ग्रीन पार्क हॉटेलमध्ये रचला सापळा
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने ११ व १२ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती ५ लाख ८० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. यापूर्वी दिलेले १ लाख रुपये वगळून उर्वरित ४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम खासगी इसम तथा सुपरवायझर बारकु पाटील याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगण्यात आले.
बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील हॉटेल ‘ग्रीन पार्क’ येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ४ लाख ८० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने सुपरवायझर बारकु पाटील याला जागीच पकडले. या कारवाईनंतर पुरुषोत्तम वाघ यालाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या पथकाने बजावली धडक कामगिरी
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली नंदुरबार (कॅम्प जळगाव) एसीबीच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. या पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पीएसआय सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे तसेच पोलीस कर्मचारी राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर आणि मनोज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- दूरध्वनी: ०२५७-२२३५४७७
- व्हॉट्सअॅप: ७५८८६६१०६४
- टोल फ्री क्रमांक: १०६४





