इतर

थॅलेसेमिया रुग्णांचे आधारस्तंभ रणजीत गव्हाळे यांना ‘समाजगौरव पुरस्कार’

सुजय प्रतिष्ठानतर्फे सन्मान; ७७ वेळा रक्तदान, पत्नी अंकिता गव्हाळे यांचेही १८ वेळा रक्तदान

थॅलेसेमिया रुग्णांचे आधारस्तंभ रणजीत गव्हाळे यांना ‘समाजगौरव पुरस्कार’

सुजय प्रतिष्ठानतर्फे सन्मान; ७७ वेळा रक्तदान, पत्नी अंकिता गव्हाळे यांचेही १८ वेळा रक्तदान

पुणे : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश कृतीतून जपत थॅलेसेमिया रुग्णांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणारे रणजीत गव्हाळे यांना सुजय प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने यंदाचा ‘समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

थॅलेसेमिया रुग्णांसाठी आधार

थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. अनेक कुटुंबांसमोर वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान असते. ही गरज लक्षात घेऊन रणजीत गव्हाळे यांनी नोकरी सांभाळत रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. रक्तदात्यांची यादी तयार करणे, रक्तपेढ्यांशी समन्वय साधणे आणि गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात.

रात्र-अपरात्री मदतीचा फोन आला तरी तत्परतेने धावून जाण्याची त्यांची सेवा सुरू आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचे कामही ते करतात.

‘अंक-जीत परिवार’च्या माध्यमातून चळवळ

रणजीत गव्हाळे हे ‘अंक-जीत परिवार’च्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ व्यापक करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत ७७ वेळा रक्तदान केले असून त्यांच्या पत्नी अंकिता गव्हाळे यांनीही १८ वेळा रक्तदान केले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार सोहळ्यास मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ‘थर्मोकोल मॅन’ म्हणून परिचित रामदास माने, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव तसेच शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा विद्या जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  • हा पुरस्कार प्रत्येक रक्तदात्याचा’

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रणजीत गव्हाळे म्हणाले, “हा पुरस्कार माझा नसून अंक-जीत परिवारासोबत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आहे.” थॅलेसेमिया रुग्णांसाठी सुरू असलेल्या या सेवेला मिळालेला सन्मान रक्तदान चळवळीला अधिक बळ देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button