इतर

पाचोऱ्यात ९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

कारसह मोठा साठा ताब्यात; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोऱ्यात ९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

कारसह मोठा साठा ताब्यात; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा | प्रतिनिधी पाचोरा शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या छाप्यात सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न सुरक्षा विभागाला पुनगाव रोड परिसरात उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी पाचोरा पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकला.

छाप्यामध्ये वाहनाची तपासणी केली असता डिक्कीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. कारवाईदरम्यान सुमारे ४ लाख रुपये किमतीची कार आणि ४ लाख ९८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असा एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी प्रशांत चौधरी याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ हे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

या धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरातील प्रतिबंधित गुटख्याचा अवैध साठा व विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या संयुक्त कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button