नोंदणीकृत संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, – नोंदणीकृत संस्थांच्या तपासणी करण्याकरिता जिल्हा स्तरावर तपासणी समिती गठीत करावयाची आहे. या समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.यासाठी 30 ऑगस्ट 2023 पर्यंत महिला व बालविकास विभागाकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 4 नुसार समितीची स्थापन करण्यात येत असते. बालहक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा एक सदस्य तसेच बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला मानसोपचार तज्ज्ञ एक सदस्य यांची संस्था तपासणी समितीत निवड करावयासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
प्रस्ताव सादर करणाऱ्या अशासकीय सदस्य किमान पदवीधर असणे आवश्यक असून बाल हक्क, काळजी व संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. सदस्यांचे वय 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून तीन वर्षाचा राहील.
तरी इच्छुक व पात्र व्यक्तीनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव आपल्या वैयक्तिक माहिती व फोटोसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव या पत्त्यावर दोन प्रतीत अर्ज सादर करण्यात यावा. असे आवाहन श्रीमती सोनगत यांनी केले आहे.