

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमातून क्रीडा संघटनांना डावलले! जळगावात क्रीडा क्षेत्रात तीव्र संताप
पोस्टरवर संयुक्त विद्यमाने उल्लेख, प्रत्यक्षात निमंत्रणच नाही; क्रीडा संघटक फारुक शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी!
जळगाव: राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा संघटनांना हेतुपुरस्सर डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कार्यक्रमाच्या अधिकृत पोस्टरवर “विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने” असा स्पष्ट उल्लेख असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र बहुतांश संघटना, खेळाडू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांना निमंत्रणापासून वंचित ठेवण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यातील क्रीडा वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व क्रीडा संघटना आणि खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दिवशी जिल्हा क्रीडा महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही कोणतीही पूर्वसूचना किंवा निमंत्रण देण्यात आले नव्हते. केवळ काही मोजक्या व्यक्तींनाच या कार्यक्रमात सहभागी करून उर्वरित क्रीडा क्षेत्राला दूर ठेवण्याचा हा प्रकार क्रीडा अधिकारी कार्यालयाचा हलगर्जीपणा आहे की हेतुपुरस्सर घडवून आणलेला प्रकार, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात हॉकी, फुटबॉल, जलतरण, व्हॉलीबॉल व पॅरा ऑलिंपिक संघटनांचे अध्यक्ष/सचिव तथा राज्य गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त फारुक शेख यांनी थेट जिल्हाधिकारी तसेच क्रीडा विभागाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. क्रीडा संघटनांच्या तांत्रिक सहकार्याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाहीत, असे असतानाही राष्ट्रीय क्रीडा दिनासारख्या मुख्य सोहळ्यातून संघटनांना वगळणे हा क्रीडा क्षेत्राचा घोर अपमान असल्याचा सूर संघटकांनी आळवला आहे. भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये सर्व संघटनांना समान सन्मान व सहभाग मिळायला हवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




