

नेहरू चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान अडथळा ठरणाऱ्या “त्या ” फलकांवर महापालिकेची कारवाई
नागरिकांच्या तक्रारीची आयुक्त आदित्य जीवने यांनी घेतली तातडीने दखल
कारवाईमध्ये भेदभाव करणारे अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
जळगाव l प्रतिनिधी l ०२ सप्टेंबर २०२६ l शहरातील नेहरू चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या दुकानांच्या तसेच हॉटेलच्या फलकांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला तसेच पादचारी आणि वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे फलक हटविण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या परिसरात कारवाई करत मोठ्या संख्येने फलक हटविण्यात आले होते. मात्र, या कारवाईनंतरही काही दुकान आणि हॉटेलचे तीन ते चार फलक जैसे थे ठेवण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यानंतरही काही फलकांवर कारवाई न झाल्याने या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी थेट महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्याकडे तक्रार केली. नागरिकांच्या तक्रारीची आयुक्तांनी तातडीने दखल घेत अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना देत उर्वरित फलकांवरही त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने नेहरू चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान पाहणी करून रस्त्यात अडथळा ठरणारे उर्वरित फलक हटविले. त्यामुळे कारवाईत कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
‘चुकीचे काम करणारे सर्वच सारखे’ :
या कारवाईच्या माध्यमातून आयुक्त आदित्य जीवने यांनी व्यवसायिकांसोबतच महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. चुकीचे काम करणारा कोणीही असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले.
‘चुकीचे काम करणारे सर्वच सारखे आहेत, कुणीही लहान-मोठा नाही’ असा इशाराच आयुक्तांनी या कारवाईच्या माध्यमातून दिल्याची चर्चा आहे. *कारवाई करताना कोणालाही झुकते माप न देता नियम सर्वांसाठी समान असावेत* यावर प्रशासनाने भर दिला आहे.
सोयीस्कर कारवाईला लगाम?
काही फलकांवर कारवाई झाल्यानंतरही काही फलक तसेच राहिल्याने अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी थेट दखल घेत संबंधित विभागाला कारवाईच्या सूचना दिल्याने सोयीस्कर भूमिका घेऊन होणाऱ्या कारवाईला लगाम घालण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, रस्ते आणि पादचारी मार्ग मोकळे ठेवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फलकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने कारवाई करून आयुक्तांनी प्रशासनातील जबाबदारी निश्चित करण्याचा दिलेला संदेश आणि रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी घेतलेली भूमिका यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



