खान्देशजळगांवसामाजिक

फैजपूरमध्ये जन्म-मृत्यू दाखल्यांचा प्रश्न ऐरणीवर!

फैजपूरमध्ये जन्म-मृत्यू दाखल्यांचा प्रश्न ऐरणीवर!

बारकोड असलेले २५० हून अधिक दाखले चार महिन्यांपासून प्रलंबित; उपनगराध्यक्ष विनोद चौधरी यांचे तात्काळ मंजुरीसाठी निवेदन

फैजपूर | प्रतिनिधी
फैजपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बारकोड असलेल्या ऑनलाइन जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदी गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तब्बल २५० हून अधिक दाखले मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन प्रणालीद्वारे तयार करण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांची ऑनलाइन मंजुरी मिळाल्यानंतरच फैजपूर नगरपरिषदेतून संबंधित नागरिकांना दाखले वितरित केले जातात. मात्र, मंजुरी प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे नागरिकांना वारंवार नगरपरिषदेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत १ सप्टेंबर रोजी फैजपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद उर्फ पप्पू चौधरी यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर करून ऑनलाइन प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच दाखले प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच, प्रलंबित असलेल्या सर्व जन्म-मृत्यू नोंदींना तात्काळ ऑनलाइन मंजुरी देऊन नागरिकांना दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीवर जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भाएकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या कामासाठी संपूर्ण एक दिवस देऊन एका दिवसात सर्व प्रलंबित नोंदी क्लिअर करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

निवेदन स्वीकारताना जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भाएकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

दरम्यान, फैजपूरच्या नगराध्यक्ष सौ. दामिनी पवन सराफ यांनीही या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर चार महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या २५० हून अधिक जन्म-मृत्यू दाखल्यांना मंजुरी मिळणार का? याकडे फैजपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button