खान्देशजळगांवशिक्षण

रोजलँड स्कूलमध्ये ना. धो. महानोर स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

रोजलँड स्कूलमध्ये ना. धो. महानोर स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी

कविवर्य स्वर्गीय ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मूळजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका सौ. प्रा. सुजाता देशपांडे उपस्थित होत्या. एम.कॉम., डी.एच.ई. शिक्षण प्राप्त केलेल्या देशपांडे यांनी मूळजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल ३० वर्षे प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. तसेच जैन इरिगेशन, जळगाव येथील श्री. सुबोध जयंत सराफ, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ऑफिसर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य ना. धो. महानोर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा, व्याकरण आणि भाषेच्या शुद्धतेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या मराठी व्याकरण गुरू स्वर्गीय प्रा. यास्मिन शेख यांच्या कार्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी वातावरण भावपूर्ण झाले.

स्पर्धेत विविध शाळांमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील बालकवींनी नामांकित कवींच्या विविध कविता प्रभावीपणे सादर केल्या. ओजस्वी आवाज, स्पष्ट उच्चार, योग्य भावाभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. बालकवींच्या सादरीकरणातून मराठी कवितेची समृद्धता, सौंदर्य आणि भावविश्वाचा प्रत्यय उपस्थितांना आला.

प्रमुख पाहुण्या सौ. प्रा. सुजाता देशपांडे आणि श्री. सुबोध सराफ यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे व आत्मविश्वासाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयीची आवड निर्माण होते. तसेच कविता, साहित्य आणि संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक दृढ होते, असे त्यांनी मनोगतात सांगितले.

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या साहित्यिक कार्याला अभिवादन करण्याबरोबरच मराठी भाषा, कविता आणि व्याकरणाच्या समृद्ध परंपरेचा जागर या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button