इतर

दीड महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा

दीड महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा

जिल्ह्यात सरासरी १६.५ मिलिमीटर पाऊस; पाळधी मंडळात सर्वाधिक ५६.५ मिमी नोंद

जळगाव | प्रतिनिधी

गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या बळीराजाला अखेर दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावत जिल्ह्यात सरासरी १६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दीर्घ खंडानंतर झालेल्या या पावसामुळे उशिराने लागवड केलेल्या कपाशी, तूर आणि ज्वारी पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, आगामी रब्बी हंगामाच्या तयारीलाही बळ मिळण्याची शक्यता आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावासह पावसाच्या दीर्घ खंडाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः सोयाबीन आणि मक्याची पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत पोहोचली आहेत. मात्र, उशिराने लागवड झालेली कपाशी, तूर आणि ज्वारीची पिके अद्याप तग धरून असल्याने या पावसाचा त्यांना मोठा फायदा होणार आहे.

शनिवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने रविवारी, १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत आणखी समाधानकारक पाऊस झाल्यास उशिराच्या खरीप पिकांसह रब्बी हंगामासाठीही परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.

पाळधी मंडळात सर्वाधिक ५६.५ मिमी पाऊस

धरणगाव तालुक्यातील पाळधी मंडळात जिल्ह्यात सर्वाधिक ५६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जळगाव तालुक्यातील म्हसावद मंडळात ५३.८ मिमी, तर जामनेर तालुक्यातील तोडापूर मंडळात ५२.५ मिमी पाऊस झाला. अमळनेर तालुक्यातील भरवस मंडळात ४९ मिमी, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव मंडळात ४० मिमी, यावल तालुक्यातील किनगाव मंडळात ३७.५ मिमी आणि एरंडोल तालुक्यातील कोसादा मंडळात ३७ मिमी पावसाची नोंद झाली.

जळगाव, असोदा आणि पिंप्राळा मंडळांतही ३० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. भुसावळ मंडळात ३२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

तालुकानिहाय पाऊस

जळगाव ३६.२ मिमी, भुसावळ २०.३ मिमी, यावल १६.४ मिमी, रावेर १२.० मिमी, मुक्ताईनगर १९.४ मिमी, अमळनेर २१.७ मिमी, चोपडा १९.२ मिमी, एरंडोल २१.४ मिमी, पाचोरा ३.९ मिमी, चाळीसगाव ०.७ मिमी, जामनेर २२.३ मिमी, भडगाव ४.८ मिमी, धरणगाव १९.७ मिमी आणि बोदवड २२.९ मिमी. जिल्ह्याची सरासरी १६.५ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button