इतरखान्देशगुन्हेजळगांव

भडगावात तरुणाची गोळी झाडून आत्महत्या; अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शहर हादरले

भडगावात तरुणाची गोळी झाडून आत्महत्या; अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शहर हादरले

खुशाल आप्पा नगरातील घटना

भडगाव : प्रतिनिधी भडगाव शहरातील खुशाल आप्पा नगर परिसरात २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. स्वप्नील प्रवीण शिंपी असे मृत तरुणाचे नाव असून, अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील दुपारी आपल्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करून झोपला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्याच्या आईने दरवाजा ठोठावून हाक मारली, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय वाढला. मोबाईलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर खिडकीतून पाहिले असता स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढत तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पोलीस व फॉरेन्सिक पथकाची तपासणी
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले आहेत. गावठी कट्टा, मोबाईल फोन तसेच रक्ताचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
स्वप्नीलने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्याकडे गावठी कट्टा कसा आला, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्रांच्या हालचालींबाबतही चर्चा रंगू लागली आहे. पोलीस या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत.

परिसरात शोककळा
अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शिंपी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button