खान्देशजळगांवसामाजिक

भादली बु. येथे केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत चिमुकल्यांची चमक

भादली बु. येथे केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत चिमुकल्यांची चमक

कानसवाडेच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला

जळगाव | प्रतिनिधी

जिल्हा परिषद जळगाव आणि विनोबा टीम यांच्या संयुक्त विद्यमाने भादली केंद्रात केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. केंद्रातील विविध शाळांमधील बाल स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगून आपल्या बुद्धिमत्तेची आणि भाषिक कौशल्याची चुणूक दाखविली. विद्यार्थ्यांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीमुळे स्पर्धेला उत्साहाचे वातावरण लाभले.

विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या गटात जि. प. प्राथमिक शाळा कानसवाडे येथील रितिका शरद कोळी आणि जि. प. प्राथमिक शाळा देऊळवाडे येथील नयन खुशाल सोनवणे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

दुसऱ्या गटात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली. या गटात जि. प. प्राथमिक शाळा कानसवाडे येथील निलेश पुरुषोत्तम कोळी आणि यश ईश्वर कोळी यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटांमध्ये विद्यार्थ्यांनी अचूक स्पेलिंग सांगत परीक्षकांसमोर आपली तयारी सिद्ध केली.

स्पर्धेचे परीक्षण सविता पाटील आणि प्रज्ञा नारखेडे यांनी केले. त्यांनी पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने परीक्षण करत दोन्ही गटांतील विजेत्यांची निवड केली.

केंद्र समन्वयक वैशाली बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार शिक्षक कुणाल पवार यांनी मानले.

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान, शब्दसंग्रह आणि अचूक उच्चार व स्पेलिंगची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरली. विजेत्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button