

भुसावळात ‘सीरत-उन-नबी’ जाहीर सभेला ८५० जणांची उपस्थिती
प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणीत प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश; सीरत प्रश्नमंजुषेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
भुसावळ | प्रतिनिधी
प्रेम, करुणा, क्षमा, संयम आणि मानवतेप्रती आदर ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाची प्रमुख शिकवण आहे. आजच्या नैतिक संकटाच्या काळात त्यांच्या जीवनातील आदर्श समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिंद, जळगावचे अध्यक्ष प्रा. सोहेल अमीर शेख यांनी केले.
जमात-ए-इस्लामी हिंद, भुसावळच्या वतीने मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी ‘सीरत-उन-नबी (स.)’ या विषयावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला, पुरुष, विद्यार्थी, पालक, विद्वान, इमाम, विचारवंत तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी अशा सुमारे ८५० जणांची उपस्थिती होती. यामध्ये सुमारे ७०० महिला व मुली आणि १५० पुरुष सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना शब्बीर यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर अखलाक भाई भुसावळ यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सध्याच्या काळात प्रेषितांच्या जीवनातील आदर्श आणि शिकवण समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना कुटुंब व समाज घडविण्याचे आवाहन
‘सीरत-ए-नबी (स.) आणि महिला’ या विषयावर साजिदा परवीन यांनी मार्गदर्शन केले. प्रेषितांच्या जीवनातून प्रेरणा घेत महिलांनी कुटुंब, घर आणि समाजाच्या जडणघडणीत प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी चारित्र्य आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे
युवकांसाठी आयोजित विशेष सत्रात मुफ्ती मुहम्मद यांनी ‘युवकांसाठी सीरत-ए-नबी (स.) यांचा संदेश’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रेषितांची शिकवण, नीतिमत्ता, चारित्र्य, संघर्ष आणि समाजहिताची भावना युवकांनी आपल्या जीवनात आत्मसात करावी. आपल्या चारित्र्य आणि कृतींच्या माध्यमातून युवक समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
मौलाना हाफिज मजीद यांनी ‘प्रेषितांची नम्रता आणि विनयशीलता’ या विषयावर विचार मांडले. प्रेषितांच्या साधेपणा, नम्रता, सौम्यता आणि उत्तम आचरणाचे विविध पैलू त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यावेळी आसिम यांनी नात-ए-रसूल-ए-मकबूल (स.) सादर केले.
प्रेषितांचे जीवन संपूर्ण जीवनसंहिता
अध्यक्षीय भाषणात प्रा. सोहेल अमीर शेख यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा संदर्भ देत प्रेम, संयम, त्याग, क्षमाशीलता आणि मानवतेप्रती असलेल्या त्यांच्या भावनेवर प्रकाश टाकला.
आज मानवजात नैतिक संकट, उदासीनता, द्वेष आणि विविध सामाजिक समस्यांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत प्रेषितांच्या शिकवणीची आणि आदर्श जीवनाची समाजाला पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे. कठीण परिस्थितीतही त्यांनी संयम, शहाणपण, चिकाटी आणि उत्तम नैतिकतेचा मार्ग सोडला नाही. त्यामुळे आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन निराशा आणि निष्क्रियतेवर मात करावी, असे त्यांनी सांगितले.
प्रेषितांचे जीवन केवळ ऐतिहासिक घटनांचा संग्रह नसून एक संपूर्ण जीवनसंहिता आहे. नैतिकता, व्यवहार, सामाजिक दृष्टिकोन आणि दैनंदिन जीवनात त्यांच्या आदर्शांचे पालन केल्यास आपले आचरणच समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकते, असेही प्रा. शेख यांनी नमूद केले.
सीरत प्रश्नमंजुषेतील विद्यार्थ्यांचा गौरव
३० ऑगस्ट रोजी विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सीरत प्रश्नमंजुषा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या यशाचे कौतुक केले.
नव्या पिढीला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवन, शिकवण आणि नैतिक मूल्यांची माहिती व्हावी तसेच सीरत हा केवळ अभ्यासाचा विषय न राहता प्रत्यक्ष जीवनाचा भाग बनावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मोठ्या संख्येने झालेला सहभाग आणि विविध वक्त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने झाली. आयोजकांनी वक्ते, मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांचे आभार मानले.




