
३ घरफोड्यांचा उलगडा करत सराईत टोळीच्या आवळल्या मुसक्या; ६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
५ आरोपी अटकेत, निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई
रावेर/निंभोरा (प्रतिनिधी) : निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी येथे झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबईसह खिर्डी येथून पाच संशयित आरोपींना गजाआड केले. या कारवाईमुळे खिर्डी परिसरातील एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घर बंद असल्याचा फायदा घेत घरफोडी मिळालेल्या माहितीनुसार, खिर्डी (ता. रावेर) येथील रहिवासी रोहनाज शेख अख्तर या आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी १३ ते १४ सप्टेंबर २०२६ दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबईतून आवळल्या मुसक्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित नवाज शेख याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने एका आरोपीला मुंबईतून, तर उर्वरित आरोपींना खिर्डी येथून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. नवाज शेख शरीफ (वय २३, रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर) २. शहादत बेग रफिक बेग (वय २२, रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर) ३. अशपाक उर्फ अट्ट्या शेख रमजान (वय ३२, रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर) ४. शाकीब बेग साबीर बेग (वय ३२, रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर) ५. चेतन लीलाधर जाधव (वय २९, रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर)
इतर २ गुन्ह्यांचीही दिली कबुली
अटक आरोपींकडे पोलीस कोठडीदरम्यान सखोल चौकशी केली असता, त्यांनी मूळ गुन्ह्यासह खिर्डी गावात आणखी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. मुख्य गुन्ह्यातील ५ लाख ७९ हजार ३१० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने (पोत, झुमके, अंगठ्या, फुलतोडे, बांगड्या, कडे) व रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच इतर दोन गुन्ह्यांतील ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मूर्ती (लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ व गणपतीच्या चांदीच्या मूर्ती) असा एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मीरा देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी, पोलीस अंमलदार रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, सुभाष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सर्फराज तडवी व सहकाऱ्यांनी केली. अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.



