खान्देशगुन्हेजळगांव

वीजचोरीचा गुन्हा टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; महावितरणचा सहाय्यक अभियंता रंगेहाथ जाळ्यात

वीजचोरीचा गुन्हा टाळण्यासाठी १५ हजारांची लाच; महावितरणचा सहाय्यक अभियंता रंगेहाथ जाळ्यात

जळगावच्या पांडे चौकातील कारवाई; वरिष्ठ तंत्रज्ञांसह तिघांवर लाच मागितल्याचा आरोप

जळगाव, प्रतिनिधी : वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. जळगाव शहरातील पांडे चौकात शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी ही सापळा कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांवर लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपी लोकसेवक विशाल वसंत नेमाडे (वय ३७, सहाय्यक अभियंता), भरत कडू तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ) हे महावितरणच्या जळगाव शहरातील महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत.

वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता तिन्ही कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन नवीन वीजमीटरची तपासणी केली. यावेळी घरातील विद्युत उपकरणांचे छायाचित्रही काढण्यात आले.

त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे यांनी तक्रारदार यांना फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे घरातील विद्युत उपकरणांचा लोड अधिक असल्याचे आणि सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगण्यात आले. वीजचोरीची कारवाई टाळण्यासाठी ४० हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तडजोडीनंतर १५ हजारांची मागणी

या कथित लाचमागणीविरोधात तक्रारदार यांनी १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीदरम्यान भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी वीजचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचेही त्यात म्हटले आहे.

पांडे चौकात सापळा; सहाय्यक अभियंता जाळ्यात

तक्रारीच्या पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पांडे चौकात पंचांसमक्ष भरत तायडे यांनी लाचेची रक्कम सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना नेमाडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लाच मागणी आणि स्वीकारण्याच्या आरोपामुळे महावितरणच्या संबंधित उपविभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button