
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची दुहेरी रौप्यपदकाची कमाई
ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डंका; केरिन प्रकारात चौथे स्थान

जळगाव, प्रतिनिधी : पंजाबमधील अमृतसर येथील गुरू नानक देव विद्यापीठात पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत जळगावची सुकन्या आकांक्षा म्हेत्रे हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्यपदकांची कमाई केली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. आकांक्षा ही जैन इरिगेशनचे सहकारी जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी विशेष कौतुक केले.
१८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या वैयक्तिक ‘टाइम ट्रायल’ प्रकारात आकांक्षाने वेगवान कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘टीम स्प्रिंट’ प्रकारातही आपल्या संघासह उत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्या रौप्यपदकावर नाव कोरले.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या ‘केरिन’ (Keirin) प्रकारातही आकांक्षाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. मात्र, पदकाने तिला थोडक्यात हुलकावणी दिल्याने चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकून आकांक्षाने जळगावसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




