मंदिराला लागली आग, जिल्हा बँकेची शाखा खाक; आमोदा येथील घटना
खान्देश टाइम्स न्यूज | ०३ मे २०२४ | यावल तालुक्यातील आमोदा येथील पुरातन राम मंदिराला गुरुवारी रात्री अचानक भीषण आग लागली. यात संपूर्ण मंदिर आगीत भक्षस्थानी पडले आहे. तसेच मंदिराच्या वर असलेली जिल्हा बँक शाखाही या आगीत जळून खाक झाली.
फैजपूरपासून ५ किलोमीटर लांब असलेल्या आमोदा या गावामध्ये प्रभू श्रीराम यांचे अनेक वर्षांपासूनचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पूर्ण लाकडी आहे. तसेच या मंदिराच्या वरच्या मजल्यावर जिल्हा बँकेची शाखा सुद्धा आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या मंदिराला आग लागली व पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीत मंदिराच्या वर असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नागरिकांसह अग्निशामक दलाचे बंबांनी आग भिजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. फैजपूर, सावदा, रावेर, यावल, भुसावळ या ठिकाणच्या सुमारे आठ बंबांनी पहाटे दोन वाजेपर्यंत पूर्ण आग आटोक्यात आणून विझवली.
या सर्व आगीमध्ये मंदिर आणि बँक दोघांचे अंदाजे २ लाखांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. फैजपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.