
लाचखोरीत जळगाव जिल्ह्यात महसूल विभाग अव्वल !
लाचलुचपत विभागाच्या ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’ला प्रारंभ ; भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईचा निर्धार!
जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात दरवर्षी आयोजित होणारा “दक्षता जनजागृती सप्ताह” यंदा २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने उत्साहात सुरू झाला आहे. “सत्यनिष्ठेचा संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी” या संकल्पनेखाली विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान जिल्ह्यात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल असून पाठोपाठ पोलीस आणि महावितरणचा क्रमांक लागला आहे. एसीबीने एकूण ३५ कारवाया केल्या असून ५६ संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.
मागील वर्षभरात जळगाव विभागाने ३७ लाचखोरीच्या कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या. चालू वर्षात (जानेवारी २०२५ ते २८ ऑक्टोबर २०२५ अखेर) ३५ कारवाया पूर्ण झाल्या आहेत. यापैकी महसूल विभाग सर्वाधिक ७ कारवायांसह अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ महावितरण (४), पोलिस विभाग (४), जिल्हा परिषद शिक्षण विभाग (३), जळगाव महानगरपालिका (२), ग्रामपंचायत (२), वन विभाग (२) आणि सरपंच (२) अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे.
इतर विभागांमध्ये खासगी व्यक्ती, जिल्हा परिषद पाणीपुरवठा, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामसेवक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या प्रत्येकी १ कारवाईसह एकूण ३५ कारवाया पूर्ण झाल्या. यात ५३ पुरुष आणि ३ महिला अशा ५६ संशयितांवर कारवाई झाली आहे.
२७ ऑक्टोबर रोजी विभागीय कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन झाले. शहरातील प्रमुख ठिकाणी पोस्टर्स व होर्डिंग्ज लावून जनजागृती केली जात आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क :
पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर : ९७०२४३३१३१
लँडलाइन : ०२५७-२२३५४७७
टोल फ्री क्रमांक : १०६४
ई-मेल : dyspacbjalgaon@gmail.com
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. “भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनी पुढाकार घ्या!” असे संदेश या सप्ताहातून दिला जात आहे.





