खान्देशजळगांवराजकीय

जळगाव बाजार समितीत सत्तासंघर्ष; सभापती सुनील महाजनांविरोधात अविश्वास प्रस्ताव

जळगाव बाजार समितीत सत्तासंघर्ष; सभापती सुनील महाजनांविरोधात अविश्वास प्रस्ताव
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सभापती सुनील महाजन यांच्या कार्यपद्धतीविरोधात तब्बल १८ पैकी १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे महाजन यांच्या सभापतीपदावर आता गंडांतर निर्माण झाले असून, बाजार समितीच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘मनमानी कारभार’चे आरोप तीव्र

अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या संचालकांनी सभापती महाजन यांच्यावर कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना संचालक मंडळाला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याने बाजार समितीचा कारभार लोकशाही पद्धतीने न चालता ‘मनमानी’ पद्धतीने चालत असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर

सोमवारी (दि. २७) नाराज संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास प्रस्ताव अधिकृतपणे सादर केला. या प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर नियमानुसार विशेष सभा बोलावली जाणार असून, त्यात गुप्त मतदानाद्वारे सभापतींचे भवितव्य ठरणार आहे. सध्या विरोधकांकडे आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत असल्याने प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती?

विशेष म्हणजे, ऑगस्ट २०२५ मध्ये तत्कालीन सभापती शामकांत सोनवणे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत सुनील महाजन यांनीच १३ मतांनी विजय मिळवला होता. आता त्याच पद्धतीने त्यांच्या विरोधातच अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने ‘जशास तसे’ राजकारण पाहायला मिळत आहे.

संचालकांच्या सह्या; राजकीय गणिते स्पष्ट

या अविश्वास प्रस्तावावर लक्ष्मण पाटील, शामकांत सोनवणे, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, जयराज चव्हाण, मिलिंद चौधरी, पल्लवी देशमुख, हेमलता नारखेडे, संदीप पाटील, समाधान धनगर, अरुण पाटील, लिना महाजन आणि यमुना सपकाळे या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे सत्तांतराची समीकरणे जवळपास स्पष्ट झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button