मनपा मालकीचा खुला भूखंड वाचला; ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याला यश इंडियन रेडक्रॉस सोसायटी व वैद्यकीय महाविद्यालयाला माघार; मनपाने पुन्हा लावला ताब्याचा फलक जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर हा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात कायम राहिला आहे. या प्रकरणानंतर महापालिकेकडून संबंधित जागेवर अधिकृत ताब्याचा फलकही लावण्यात आला. सदर जागा अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा विकासकाम न झाल्याने ही जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आली होती. दरम्यान, परिसरातील युवक या मोकळ्या जागेचा मैदानी खेळांसाठी वापर करत होते. काही दिवसांपूर्वी या जागेची संरक्षण भिंत रात्रीतून तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. इंडियन रेडक्रॉस सोसायटी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पार्किंगसाठी जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. त्यांनी हा प्रकार “लँड माफियांच्या पद्धतीचा” असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले. काही काळ या ठिकाणी वादावादीचे वातावरण निर्माण झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी संबंधित जागा न्यायप्रविष्ट असल्याचा दावा करत काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ॲड. पियुष पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांसह जागेचा ताबा मनपाकडे असल्याचा दावा ठामपणे मांडला. नगररचना विभागाचे अध्यक्ष अमोल पाटील, अभियंता विजय मराठे, प्रभाग अभियंता पुराणिक आदी अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. अखेर महापालिकेने जागेवर ताब्याचा बोर्ड लावत भूखंडावर आपला हक्क कायम ठेवला. दरम्यान, यापूर्वीही सुमारे दहा वर्षांपूर्वी इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून या जागेवर अनधिकृत गेट उभारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांनी या प्रकाराला विरोध केला होता. तसेच, सदर जागेवर विनापरवानगी आणि विना-टेंडर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शहरातील खुल्या भूखंडांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मनपा मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मनपा मालकीचा खुला भूखंड वाचला; ॲड. पियुष पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
इंडियन रेडक्रॉस सोसायटी व वैद्यकीय महाविद्यालयाला माघार; मनपाने पुन्हा लावला ताब्याचा फलक
जळगाव : शहरातील मध्यवर्ती भागात इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर हा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात कायम राहिला आहे. या प्रकरणानंतर महापालिकेकडून संबंधित जागेवर अधिकृत ताब्याचा फलकही लावण्यात आला.
सदर जागा अनेक वर्षांपूर्वी नर्सिंग होम कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा विकासकाम न झाल्याने ही जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आली होती. दरम्यान, परिसरातील युवक या मोकळ्या जागेचा मैदानी खेळांसाठी वापर करत होते.
काही दिवसांपूर्वी या जागेची संरक्षण भिंत रात्रीतून तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. इंडियन रेडक्रॉस सोसायटी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पार्किंगसाठी जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. त्यांनी हा प्रकार “लँड माफियांच्या पद्धतीचा” असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले. काही काळ या ठिकाणी वादावादीचे वातावरण निर्माण झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी संबंधित जागा न्यायप्रविष्ट असल्याचा दावा करत काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ॲड. पियुष पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांसह जागेचा ताबा मनपाकडे असल्याचा दावा ठामपणे मांडला.
नगररचना विभागाचे अध्यक्ष अमोल पाटील, अभियंता विजय मराठे, प्रभाग अभियंता पुराणिक आदी अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. अखेर महापालिकेने जागेवर ताब्याचा बोर्ड लावत भूखंडावर आपला हक्क कायम ठेवला.
दरम्यान, यापूर्वीही सुमारे दहा वर्षांपूर्वी इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून या जागेवर अनधिकृत गेट उभारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांनी या प्रकाराला विरोध केला होता.
तसेच, सदर जागेवर विनापरवानगी आणि विना-टेंडर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करत ॲड. पियुष पाटील यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शहरातील खुल्या भूखंडांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मनपा मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





