
रावेर-यावलमध्ये डिझेल तुटवड्याने केळी उद्योग संकटात; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी व वाहतूकदार अडचणीत; तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
जळगाव : रावेर आणि यावल तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल व इंधन तुटवड्यामुळे केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि वाहतूक व्यवसायिक गंभीर आर्थिक संकटात सापडले असून या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
रावेर व यावल तालुका हा राज्यभर “केळी पट्टा” म्हणून ओळखला जातो. या भागातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह केळी उत्पादन व व्यापारावर अवलंबून आहे. मात्र सध्या निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे केळी शेती, सिंचन व्यवस्था, फवारणी, ट्रॅक्टर वाहतूक तसेच बाजारपेठेत माल पोहोचविण्याची संपूर्ण साखळी विस्कळीत झाली आहे.
इंधनाअभावी केळी वाहतुकीस विलंब होत असल्याने माल खराब होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. आधीच खत, औषधे, मजुरी आणि उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. मर्यादित इंधन पुरवठ्यामुळे शेती व व्यापार दोन्ही प्रभावित झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे रावेर-यावल भागात डिझेलचा नियमित व पुरेसा पुरवठा करण्याची, केळी उत्पादक शेतकरी व वाहतूकदारांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून देण्याची, नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची तसेच कृत्रिम तुटवडा व साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांच्या वतीने देण्यात आले.





