
जळगाव पोलिसांची धडक मोहीम; टवाळखोर, स्टंटबाज आणि बेकायदेशीर कृत्यांवर करडी नजर
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या निर्देशानुसार शहर आणि परिसरात एकाच वेळी व्यापक धडक मोहीम सुरू करण्यात आली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत वाईन शॉप परिसर, मोकळी मैदाने तसेच खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्गावरील परवानाविरहित हॉटेल्स व धाब्यांमध्ये बेकायदेशीर मद्यपान करणारे आणि मद्यपानासाठी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसच्या परिसरात पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत आहे. सायंकाळच्या वेळेत भरधाव वेगाने वाहने चालविणारे स्टंटबाज, टवाळखोर आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
विशेषतः मॉडिफाय केलेले मोठे सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर संबंधित कायद्यांनुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कॅफे आणि हॉटेल्सची आकस्मिक तपासणी
शहरातील विविध कॅफे आणि हॉटेल्समध्येही पोलिसांनी आकस्मिक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. संशयास्पद परिस्थितीत आढळणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.
“नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कायदा मोडणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिला आहे.
पोलिसांनी ही मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




