खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम; ७० वर्षांनंतर प्रथमच भाजपच्या नेतृत्वाकडे धुरा

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम; ७० वर्षांनंतर प्रथमच भाजपच्या नेतृत्वाकडे धुरा

 शेतकरी कुटुंबातील युवा सहकार नेत्याची बिनविरोध निवड; राहुल काकडे उपाध्यक्ष

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (पणन महासंघ) या राज्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी खानदेशातील युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची, तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल ७० वर्षांनंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आले असून, राज्याच्या सहकार क्षेत्रात या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सह निबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले.

सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार

निवडीनंतर रोहित निकम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले. माझ्यावर दाखविण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी हित, सहकार क्षेत्राची मजबुती आणि पारदर्शक प्रशासनासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी हिताची महत्त्वाची संस्था

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ही राज्यातील खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. कृषी उत्पादनांचे विपणन, साठवणूक, खरेदी-विक्री तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी या संस्थेमार्फत केली जाते. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताशी थेट निगडित मानली जाते.

सहकार क्षेत्राचा समृद्ध वारसा

रोहित निकम यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. ते सध्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक तसेच जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय भाजप सहकार आघाडी, महाराष्ट्र राज्यचे सहसंयोजक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

निवड प्रक्रियेवेळी संस्थेचे संचालक तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार जयंत पाटील, संचालक संजय पवार, अतुल गण्यारपवार, सुभाष रघातटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील चव्हाण, पांडुरंग घुगे, संदीप नरके, प्रमोद रावराणे, आबासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या धस, अशोक हटकर, दत्तात्रय पानसरे यांच्यासह पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी केंद्रित धोरणांना मिळणार बळ

राज्यातील सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय म्हणून रोहित निकम यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अधिक प्रभावी योजना आणि उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा शेतकरी व सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button