
१ जुलैपासून बदलणार ‘हा’ महत्त्वाचा नियम; परदेश प्रवासाचा विचार असेल तर आधी हे वाचा…
नवी दिल्ली : परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने १ जुलै २०२६ पासून पासपोर्टसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४ वर्षांनंतर करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे नवीन पासपोर्ट तसेच तत्काळ (Tatkal) सेवेसाठी नागरिकांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, भारतीय पासपोर्ट हा मुख्यत्वे परदेश प्रवासासाठीचा अधिकृत दस्तऐवज असून तो भारतीय नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच दिले आहे. या पार्श्वभूमीवरच सुधारित शुल्क रचना जाहीर करण्यात आल्याने या निर्णयाची देशभर चर्चा सुरू झाली आहे.
नवीन नियमानुसार, १८ वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टचे नवीन अर्ज किंवा नूतनीकरणासाठी आता २,५०० रुपये शुल्क भरावे लागेल. यापूर्वी हे शुल्क १,५०० रुपये होते. तर तत्काळ योजनेअंतर्गत पासपोर्ट मिळवण्यासाठी ५,००० रुपये मोजावे लागतील. याआधी हे शुल्क ३,५०० रुपये होते.
याशिवाय, ६० पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य योजनेतील शुल्क २,००० रुपयांवरून ३,५०० रुपये, तर तत्काळ योजनेतील शुल्क ४,००० रुपयांवरून ६,००० रुपये करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही सुधारित शुल्क रचना १ जुलै २०२६ किंवा त्यानंतर सादर करण्यात येणाऱ्या सर्व पासपोर्ट अर्जांवर लागू होणार आहे. तसेच पासपोर्टशी संबंधित विविध सेवांच्या शुल्कातही बदल करण्यात आले आहेत.
नवीन पासपोर्ट शुल्क (१ जुलैपासून)
३६ पानांचा सामान्य पासपोर्ट: ₹२,५०० (पूर्वी ₹१,५००)
३६ पानांचा तत्काळ पासपोर्ट: ₹५,००० (पूर्वी ₹३,५००)
६० पानांचा सामान्य पासपोर्ट: ₹३,५०० (पूर्वी ₹२,०००)
६० पानांचा तत्काळ पासपोर्ट: ₹६,००० (पूर्वी ₹४,०००)
या निर्णयामुळे परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांनी १ जुलैपूर्वी अर्ज करायचा की नवीन शुल्कानुसार अर्ज करायचा, याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.





