असोदा उड्डाणपूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कडक कारवाईचे नितीन गडकरी यांचे आदेश

असोदा उड्डाणपूल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कडक कारवाईचे नितीन गडकरी यांचे आदेश
खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश; जळगावातील चार चौक व उड्डाणपुलांच्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद
जळगाव: धुळे-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या घटनेची केंद्रीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.
असोदा येथील उड्डाणपूल खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर नवी दिल्ली येथे जाऊन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची ठाम मागणी केली. या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
खासदार वाघ यांच्या मागणीची तत्परतेने दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी चौकशीचे आदेश जारी केले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासोबतच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीदरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा गंभीर मुद्दाही केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडला. त्यांनी आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास उभारण्याची मागणी केली. या सर्व प्रस्तावांना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वास खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.





