
चाळीसगावात चोरट्याला ६ तासांत ठोकल्या बेड्या; ३ लाखांचे सोने जप्त
चाळीसगाव | प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावात बंद घराचे कुलूप तोडून ३ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला मेहूणबारे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून ३३ ग्रॅम वितळवलेले सोने हस्तगत करत गुन्ह्याचा छडा लावला आहे.देवळी येथील दीपक नामदेव पाटील (वय ४८) हे १६ मे रोजी कुटुंबासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी शोकेसमधील लॉकर फोडले आणि ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजारांचा माल चोरला. २० मे रोजी ही चोरी उघडकीस आल्यानंतर पाटील यांनी मेहूणबारे पोलिसांत तक्रार नोंदवली.सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, जि. जळगाव) याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत ३ लाख २० हजार किमतीची सोन्याची लगड सुपूर्द केली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.