

पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली तत्पर मदत
पाळधी (प्रतिनिधी) : पाळधी बायपास रस्त्यावर एका वेगात जाणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटून तो भीषणरीत्या पलटी झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघातात दोनगाव बुद्रुक येथील कोळी समाजातील एका तरुणाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या बातमीने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत तरुणाचे नाव किरण जनार्दन सोनवणे वय 20 रा. दोनगाव ता. धरणगाव असून तो कॉलेजला शिकत असल्याची माहिती मिळाली.
अपघाताचे वृत्त समजताच, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील हृदयद्रावक दृश्य पाहून मन हेलावून गेले तरीही स्वतःला सावरून पाटील बंधूंनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले.
स्वतः उपस्थित राहून रुग्णवाहिका पाचारण केली व पुढील सर्व आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय मदतीसाठी यंत्रणा गतिमान केली. या दुर्दैवी घटनेमुळे दोनगाव बुद्रुक गावावर व कोळी समाजावर शोककळा पसरली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.




