
हरवलेला चिमुकला अवघ्या काही तासांत कुटुंबीयांच्या ताब्यात; पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
जळगाव : असोदा येथील चार वर्षीय निखिल विजय कोळी हा रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता चौगुले प्लॉटजवळील रेल्वे बोगद्याजवळ एकटाच आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणले.
यानंतर पोलीस कर्मचारी योगेश जोशी आणि महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा खैरे यांनी मुलाच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. परिसरात चौकशी करण्यासोबतच विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर मुलाची माहिती आणि छायाचित्र प्रसारित करण्यात आले.
पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले आणि मुलाची आई कल्पना विजय कोळी, आजी कलाबाई प्रकाश सोनवणे तसेच मामा नवल अशोक सोनवणे (रा. शिवाजीनगर) पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी मुलाची ओळख पटवल्यानंतर निखिलला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
हरवलेला चिमुकला सुखरूपपणे कुटुंबीयांच्या ताब्यात मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




