
तीन दिवस कोरडे नळ, चौथ्या दिवशी पाणी; त्यातही वीज गुल!
कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने शनिपेठकरांचा संताप; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
खानदेश टाइम्स न्यूज | जकी अहमद
जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात पाणीटंचाई आणि वीजपुरवठ्याच्या गोंधळाने नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. या भागात दररोज नव्हे तर तब्बल तीन दिवसांनंतर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक घरांच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे दरम्यान या परिसरामध्ये तीन दिवसा चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे आणि आज एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलण्याने आज चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात आला.
परिस्थिती अधिक गंभीर म्हणजे, चौथ्या दिवशी येणाऱ्या पाण्याच्या वेळेतच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोटार सुरू करून पाणी साठवता येत नाही. त्यामुळे पाणी आणि वीज यांचा मेळच जुळत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. दुसरीकडे, महापौरांनी शहरात दररोज पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा केला होता; मात्र शनिपेठमधील वास्तव परिस्थिती पाहता हा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
अमृत योजनेअंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी शनिपेठ परिसरात त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. कमी दाबाचा पाणीपुरवठा, चौथ्या दिवशी येणारे पाणी आणि ऐनवेळी गायब होणारी वीज यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“तीन दिवस पाण्याविना काढल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी येते आणि त्याच वेळी वीज जाते. अशा परिस्थितीत नागरिकांनी जगायचे कसे?” असा संतप्त सवाल शनिपेठकरांनी उपस्थित केला आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.




