

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
पती-पत्नीने दोन मुलांसह जीवन संपविले; घटनेने टाकरखेडा गावावर शोककळा
अमळनेर | प्रतिनिधी : तालुक्यातील टाकरखेडा येथील एका कुटुंबातील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चौघांचाही मृत्यू झाला असून, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले सनी व राज हे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली झोकून देत जीवन संपविल्याचे समोर आले. धावत्या रेल्वेखाली आल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, या कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू असली, तरी आत्महत्येचे अधिकृत कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.




