

बॉटॅनिकल ब्लिट्झ स्पर्धेत सायमा पीरजादे प्रथम; ३१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
झटपट वनस्पती ओळख स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखविले वनस्पतीशास्त्राचे ज्ञान; वनस्पती वर्गीकरणाबाबत जागृतीचा उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थिम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘बॉटॅनिकल ब्लिट्झ – झटपट वनस्पती ओळख स्पर्धा २०२६-२७’चे आयोजन करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता आय.सी.टी. हॉलमध्ये झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत विविध वनस्पतींचे सामान्य नाव, शास्त्रीय नाव आणि कुल सांगायचे होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वनस्पती ओळखण्याच्या क्षमतेसह वनस्पतीशास्त्रातील ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. महाविद्यालयातील एकूण ३१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. इब्राहिम पिंजारी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. युसूफ पटेल यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या निकालात पीरजादे सायमा इस्माईल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. जवेरिया शेख खलील यांनी द्वितीय, तर सिक्कलगर तहेलीम फातिमा शेख हमीद यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांमध्ये वनस्पती वर्गीकरणशास्त्राबाबत जागरूकता निर्माण करणे, वनस्पती ओळखण्याची क्षमता विकसित करणे आणि वनस्पतीशास्त्र विषयाबद्दल आवड व उत्सुकता वाढविणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून घेण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. तन्वीर खान, डॉ. फिरदोस शेख, प्रा. उमर पठाण आणि प्रा. प्रवीण घाडगे यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘बॉटॅनिकल ब्लिट्झ’ स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.




