खान्देश टाइम्स न्यूज | १० जानेवारी २०२४ | वीज मीटर नसताना वीज वापर केल्याप्रकरण दंडाची रक्कम कमी करण्याच्या बदल्यात १ लाखांची लाच स्विकारताना जळगाव शहरात प्रशांत विकास जगताप (वय ३३) या कंत्राटी वायरमनला एसीबी पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला महावितरण पथकाने भेट दिली असता त्यांनी ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई :
पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील, पोना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, पोशी.राकेश दुसाने यांनी सापळा लावला. तर पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांच्या पथकाने सहकार्य केले.