जळगाव ;- देशाचा, गावाचा, पर्यायाने विभागाचा विकास करण्यासाठी तरूणांनी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन खा. रक्षा खडसे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिकशास्त्रे प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १ मार्च रोजी अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार खडसे बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. मंचावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, लिड बँकेचे व्यवस्थापन प्रणवकुमार झा, सिनेट सदस्य नेहा जोशी व स्वप्नाली महाजन, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी, प्रा. उमेश गोगडीया, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.
खा. खडसे म्हणाल्या की, तरूणांमध्ये राजकारण ही पॅशन असायला हवी. महाविद्यालयापासून राजकारण समजून घेत सहभाग वाढवावा. आजही आमदार, खासदार यांच्याकडे कोणती कामे असतात याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. राजकारण आणि प्रशासन सोबत असेल तर विकासाला गती मिळते. टिकेचे राजकारण न करता विकासाच्या भावनेतून राजकारणात या असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत तरूणांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. राजकारणात तरूणांनी सहभागी व्हावे आणि विविध विषयांवर मत मांडावीत असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषतात प्रा. माहेश्वरी यांनी देशातील तरूणांची संख्या पाहता पुढचे शतक भारताचे असून अशावेळी त्यांना विधायक कामाला लावण्यासाठी उत्तम नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व तरूणांमधून तयार व्हावे त्यासाठी शिस्त, संवाद कौशल्य आदी गुणांची गरज असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले. यावेळी डॉ. सचिन नांद्रे, प्रा. अजय पाटील, प्रणवकुमार झा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मॉक पॉर्लमेंट मधील विजेते निर्भय सोनार, गुणवंत बोरसे, यांचा सत्कार करण्यात आला. तेजस पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजिंक्य गवळी यांनी आभार मानले.