जळगाव : युवा संमेलनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी जिल्ह्या दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पथक जळगावात दाखल झाले. या पथकाने विमानतळासह सभास्थळाची पाहणी करीत आढावा घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचा जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा होती. दोन वेळा त्यांचा दौरा रद्द देखील झाला होता. दरम्यान, मंगळवार दि. ५ रोजी अमित शहा हे जळगावात येणार असल्याने सर्व यंत्रणा सज्ज झाला असून त्यांच्याकडून आढावा घेतला जात आहे.
या दौऱ्याच्या दोन दिवस अगोदरच सीआरपीएफचे पथक रविवारी सकाळीच जळगावात दाखल झाले होते. तीन अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांसह असलेल्या या पथकाने विमानतळासह सभास्थळ असलेल्या सागर पार्कची पाहणी केली. या सोबतच पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. युवा संमेलनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या दौऱ्यासाठी मोठा बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी पोलिस दलाकडून नियोजन करण्यात येत असून सोमवार दि. ४ मार्च रोजी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.