फत्तेपूर, ता जामनेर. : शेंगोळा गावात दिवसा हातात कुकरी घेऊन दहशत माजवणाऱ्या दिलावर गुलशेर तडवी (वय ३२) याला प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पो. कॉ. सोपान गायकवाड यांनाच त्याने धक्काबुक्की करून मारहाण केली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दिलावर गुलशेर तडवीहा शेंगोळा गावात हातात कुकरी घेऊन वहशत माजवत होता. ही माहिती फत्तेपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पोलिसांनी दिलावर तडवी याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पो. कॉ. सोपान गायकवाड यांना धक्काबुक्की करुन मारहाण करत त्यांना जखमी केले.
याबाबत पो.कॉ. सोपान गायकवाड यांनीदिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय सहिता कलम १३२ सह भा.ह.का. कलम ४,२५ महाराष्ट्र पो. अॅ. कलम ३७ (१) (क) ३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी दिलावर तडवी याला जेरबंद केले आहे. यातपास सपोनि गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. आर. के. शेख व कर्मचारी करत आहेत.