इतर

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात ३४ लाख रुपयांची चोरी

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात ३४ लाख रुपयांची चोरी
राजवड येथे घराचे कुलूप तोडून सोनं, रोकड आणि डीव्हीआर लंपास

पारोळा तालुक्यातील राजवड येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ३४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास घडली. पाटील कुटुंबीय २७ जुलैपासून नाशिक येथे मुलाकडे गेले होते. २ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारील अरुण पाटील यांनी त्यांच्या नातवाला घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घराची पाहणी केली असता दरवाजांचे कुलूप तुटलेले, कपाटे उघडलेली आणि सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

दुपारी दीड वाजता पाटील राजवड येथे पोहोचले. घरातील कपाट व बेड उचकावून ठेवलेले आढळले. चोरट्यांनी ३०० ग्रॅम सोन्याची मंगलपोत (९ लाख रुपये), २०० ग्रॅम १६ सोन्याच्या अंगठ्या (७ लाख रुपये), २०० ग्रॅम ३ सोन्याचे नेकलेस (८ लाख रुपये), रोख १० लाख रुपये आणि ८ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर असा एकूण ३४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी निलेश ऊर्फ बाळा अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे पहाटे २.३९ वाजता धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून येऊन कंपाउंडची भिंत ओलांडून घरात प्रवेश करताना आणि ३.१४ वाजता घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यांनी अवघ्या ३५ मिनिटांत चोरी करून पोबारा केला. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय जितेंद्र वलटे, एपीआय योगेश महाजन, हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि ठसे तज्ज्ञांच्या साहाय्याने तपास सुरू करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button