खराब रस्त्यांमुळे एसटी बससेवा बंद होण्याच्या निर्णयाने ग्रामीण भागात चिंता; विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

खराब रस्त्यांमुळे एसटी बससेवा बंद होण्याच्या निर्णयाने ग्रामीण भागात चिंता; विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता
अकोला ;- “गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी” ही ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेवर आता खराब रस्त्यांचा परिणाम होताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था असल्यामुळे एसटी प्रशासनाने अशा मार्गांवरील बस फेऱ्या बंद करण्याचा इशारा दिला आहे.
धामणा ते हातरूण या १० किमी अंतरावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे वाहतूक सुरळीत राहणे कठीण झाले आहे. एसटी बसांचे नुकसान टाळण्यासाठी आणि अपघाताचा धोका लक्षात घेता अकोला एसटी आगाराने धामणा व बोरगाव वैराळे या ग्रामपंचायतींना पत्र देत बससेवा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
गावकऱ्यांत चिंता, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
या निर्णयामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून, विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. अकोला ते धामणा मार्गावर दिवसभरात तीन एसटी फेऱ्या चालतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बसचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
एसटी प्रशासनाने ग्रामपंचायतींना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास बससेवा कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. त्यामुळे ग्रामपंचायतींवर आता तातडीने उपाययोजना करण्याचे दडपण आहे.