
तोतया RTO अधिकारी गजाआड; समृद्धी मार्गावरून रात्रीच्या वेळी करत होते वाहनधारकांकडून आर्थिक लूट
बीड आरटीओ आणि पोलिसांची कारवाई
पाथर्डी / बीड : आरटीओच्या गाडीप्रमाणेच हुबेहूब स्कॉर्पिओ गाडी, खाकी गणवेश आणि आरटीओ अधिकाऱ्यांचा आव आणत रात्रीच्या वेळी ट्रक चालकांकडून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया ‘अधिकाऱ्यां’ना अखेर पोलिसांच्या जाळ्यात पकडण्यात आले. या कारवाईमुळे मोटार वाहन चालकांना दिलासा मिळाला असून संपूर्ण घटनेने आरटीओ प्रशासनात खळबळ उडवली आहे.
पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ नगर येथील केवल जग्गी यांचा ट्रक थांबवून, ‘फिटनेस प्रमाणपत्र संपले’ असे सांगून दोघांनी ट्रक चालक अशोक पांचाळकडे ६४ हजार दंडाची मागणी केली आणि २५ हजारांची तडजोड सुचवली. ही बाब संशयास्पद वाटल्याने ट्रक मालकाने मोटार वाहन कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क साधला.
यानंतर सानप यांनी संशयिताशी संपर्क साधला असता, त्याने स्वतःला ‘सूर्यवंशी, वडाळा आरटीओ’ म्हणवले. ही बाब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रापअ) विनोद सगरे यांना कळविण्यात आली. त्यांनी मोटार वाहन निरीक्षक सुनील पाटील यांना चौकशीचे आदेश दिले. पाटील यांच्या चौकशीत स्कॉर्पिओ गाडी ही ठाणे आरटीओ कार्यालयाची असल्याचे स्पष्ट झाले, परंतु ती गाडी कार्यालयातच असल्याचेही निष्पन्न झाले. तसेच सूर्यवंशी नावाचा कोणताही अधिकारी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या टोळीकडून मिळालेल्या माहितीनुसार ते समृद्धी महामार्गाने मुंबईहून शिर्डी येथे येत आणि रात्रीच्या वेळी नगर, श्रीरामपूर, बीड, जालना परिसरात आरटीओ अधिकाऱ्याच्या नावाखाली आर्थिक लूट करत होते. दिवसा मात्र ते छोट्या तालुक्यांमध्ये मुक्कामी राहत.
मो.वा.नि. सुनील पाटील व राहुल माने यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा छडा लागला. बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या लोकेशनच्या आधारे संबंधित गाडीसह आरोपी अजय गाडगे व दिनेश धनवर यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत अहिल्यानगर प्रापअ विनोद सगरे, बीड उपप्रापअ स्वप्नील माने, सप्रापअ बालाजी धनवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच बीड कार्यालयाचे मो.वा.नि. राहुल माने, रणजीत पाटील, चालक नितीन वक्ते, कैलास दराडे हेही कारवाईदरम्यान उपस्थित होते.
संबंधित आरोपी हे मुंबईस्थित असून, आरटीओ कार्यालयाशी त्यांचा पूर्वेतिहास आहे का, याचा तपास सुरू आहे. त्यांना सहकार्य करणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचा तपास करण्यात यावा, अशी विनंती मा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे करण्यात आली आहे.